सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ (पुणे जिल्हा) व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी-बारावी व क्रीडा विभागातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव तसेच नाभिक समाजातील विविध पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी ग.दि. माडगुळकर नाट्यगृह, आकुर्डी (पिंपरी-चिंचवड) येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात संतश्रेष्ठ सेनामहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
वडगाव निंबाळकर (ता. बारामती, जि. पुणे) येथील सामान्य परिस्थितीत वाढलेले पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे पूर्व विभाग प्रमुख मनोज जाधव यांनी परिश्रमपूर्वक पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. पुष्पा जाधव यांच्यासोबत संसार थाटल्यानंतर त्यांना दोन कन्या झाल्या. त्यापैकी मोठी कन्या बी.टेक.चे शिक्षण घेत असून, लहान कन्या नेत्रविकलांग असून बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. मुलींना वंशाचा दिवा मानत समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या श्री. मनोज जाधव व सौ. पुष्पा जाधव यांना आदर्श माता-पिता पुरस्कार २०२५ प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी समाजभूषण, आदर्श सरपंच, आदर्श कार्यकर्ता तसेच आदर्श तालुका पुरस्कार बारामती कार्यकारिणीला प्रदान करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये
इयत्ता दहावी – आर्या घाडगे, गायत्री कदम, पायल गायकवाड
इयत्ता बारावी – रिशिका शिंदे, शिवांजली राऊत, परिसा आढाव
या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांची बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले.
सदरील पुरस्कारांचे वितरण सदगुरु माऊली महाराज वाळुंजकर तसेच उपस्थित मान्यवर व समाज बांधवांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सदगुरु माऊली महाराज वाळुंजकर उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष शंकर मर्दाने होते.
कार्यक्रमाचे आयोजन गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कमिटीचे अध्यक्ष अरुण ढमाले व सर्व समिती सदस्यांनी केले. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष अशोकराव मगर, महिला अध्यक्षा मंगल आढाव, तसेच पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील नाभिक समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
