सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील गुंजवणे येथील लिम्हणवाडी रोडच्या कडेला एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवार (दि. ७) रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक ग्रामस्थ दिलीप कोथमिरे व विकास लिम्हण यांना लिम्हणवाडी रोडच्या कडेला पिवळ्या रंगाचा टी-शर्ट व निळसर रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केलेला एक अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसून आला. त्यांनी तत्काळ याची माहिती गावचे पोलीस पाटील बाळू चंदर रसाळ यांना दिली. त्यानंतर पोलीस पाटलांनी वेल्हे पोलीस स्टेशनला माहिती देत बेशुद्ध अवस्थेतील इसमाला स्वतःच्या वाहनातून ग्रामीण रुग्णालय, वेल्हे येथे दाखल केले.
मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती संबंधित इसमाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. सदर इसमाचे वय अंदाजे ३६ वर्षे असून त्याचे नाव व पत्ता अद्याप अज्ञात आहे. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो परिसरात गवंडी काम करत असल्याची सांगण्यात येते आहे.
मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, डॉक्टरांनी शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करून व्हिसेरा राखून ठेवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वेल्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. एम. काळे व तपासी अंमलदार व्ही. ई. जाधव करीत आहेत.
