Rajgad News l भूमिपुत्रांच्या हक्कासाठी ‘राजगड विकास परिषेद’ची स्थापना;

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
राजगड : मिनल कांबळे 
 राजगड परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक भूमिपुत्रांना एकत्र आणत राजगड विकास परिषद या अराजकीय सामाजिक संघटनेची स्थापना करण्यात आल्याची घोषणा संस्थापक ज्ञानेश्वर (माऊली) दारवटकर यांनी बुधवार (ता. 18) रोजी केली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला या संघटनेची अधिकृत घोषणा करण्यात आली असून राजगडच्या विकासासाठी व्यापक सामाजिक चळवळ उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. 
              राजगड हा शिवछत्रपतींच्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो. स्वराज्य विस्ताराच्या काळात येथील मावळ्यांनी हिंदुस्थानावर भगवा फडकविण्यात मोठे योगदान दिले. मात्र आज त्याच ऐतिहासिक भूमीतील गावांचा विकास अपेक्षित प्रमाणात झाला नसल्याची खंत पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली. पुणे जिल्ह्यात मागास तालुका म्हणून राजगडाची ओळख निर्माण होत असल्याने हा इतिहासाला न शोभणारा प्रकार असून निसर्गाचा मोठा वारसा लाभलेल्या या तालुक्याला सरकारने प्रति महाबळेश्वर म्हणून विकसित करणे आवश्यक आहे. तालुक्यातील नागरिक स्वातंत्र्याच्या 70 वर्षा नंतरही मूलभूत हक्काच्या रस्ते वीज पाणी यासाठी संघर्ष करीत असून स्थानिक भूमिपुत्र रोजगारासाठी पुणे मुंबई सारख्या शहरात हमाली रिक्षा चालवणे कुल्फी विकणे अल्पशा पगारावर नोकरी करणे ही कामे करीत आहेत मात्र त्यांना तालुक्यातच रोजगाराची साधन उपलब्ध करून देणे गरजेची झाली रायगडच्या धर्तीवर राजगड विकास प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी परिषदेकडून करण्यात आली आहे. 

या माध्यमातून भोर व वेल्हे तालुक्यातील गड-किल्ल्यांचे संवर्धन, ऐतिहासिक वास्तूंचे जतन, ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन आणि पर्यटन सुविधा विकसित करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे असल्याचे दारवटकर यांनी सांगितले. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा व ऐतिहासिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण करण्याचाही परिषदेकडून मानस व्यक्त करण्यात आला. राजगडच्या विकासासाठी ही सामाजिक चळवळ असून सर्व भूमिपुत्रांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन परिषदेच्या वतीने यावेळी करण्यात आले. 

या पत्रकार परिषदेस संस्थापक ज्ञानेश्वर दारवटकर सामाजिक कार्यकर्ते डॉ. संभाजी मांगडे, राष्ट्रशक्ती संघटनेचे शहाजी आरसूळ, मराठा सेवक समितीचे प्रमोद अडसूळ गोरख मानकर, रामभाऊ मांढरे, पद्माकर कांबळे, आदी उपस्थित होते.
To Top