Supe News l सुप्यात शिवजयंती उत्साहात साजरी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
प्रतिनिधी : दिपक जाधव 
सुपे येथे शिवप्रेमींच्यावतीने किल्ले धर्मवीरगड येथुन आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले. मिरवणुकीत शिवराय, जिजाऊ, सईबाई आणि मावळे आदींची वेशभुषा करून तरुणाई सहभागी झाली होती. दरम्यान दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाने येथे शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात येत असल्याची माहिती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली. 
         यावेळी येथील आझाद मैदानावरील श्रीं च्या पुतळ्यास विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. दरम्यान सायंकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची पालखीतुन मिरवणुक काढण्यात आली. येथील आझाद मैदानावर गुरुवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर शिवजयंती उत्सव समिती सुपे परगना यांच्यावतीने तसेच मान्यवरांच्या हस्ते ' श्री ' ना पुष्पहार घालण्यात आला. यावेळी येथील आवारात भव्य मंडप टाकुन पुतळ्यासभोवती आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मुख्य रस्त्यांच्या दर्शनी भागात स्वागत कमाण टाकुन परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी भुईकोट किल्ला येथुन व मुख्य पेठेतुन श्रीं ची पालखीतुन मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला. तसेच यावेळी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत करण्यात येत होते. यावेळी ढोल ताशा व झांज पथकाच्या वेगवेगळ्या खेळासह 'श्री' ची पालखीतुन भव्य मिरवणुक काढण्यात आली होती. 

 यावेळी रात्री नऊ वाजता आझाद मैदानावर मिरवणूक आल्यावर सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या हस्ते महाआरती करुन शिवजयंतीचा समारोप करण्यात आला. दरम्यान सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
                
Tags
To Top