सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वाई : प्रतिनिधी
वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून रोहित्र (डीपी) फोडून त्यातील तांब्याच्या तारेची चोरी मोठ्या प्रमाणावर होत होती. या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिल्यानंतर वाई पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांच्या माहितीद्वारे तपास सुरू केला.
धोम कालव्याच्या कडेला असलेल्या रोहित्रांजवळ सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडचणी येत होत्या. मात्र तपास पथकातील अंमलदार विशाल शिंदे, हेमंत शिंदे यांच्या तांत्रिक विश्लेषणातून तसेच विक्रम धोत्रे व श्रावण राठोड यांच्या बातमीदारांमार्फत माहिती मिळवत आरोपींचा शोध घेण्यात आला. तपासात ३ आरोपी फलटण येथील तर ३ आरोपी वाई येथील असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींकडून ३०० किलो तांब्याची तार,गुन्ह्यात वापरलेल्या २ दुचाकी व १ चारचाकी, ५ मोबाईल फोन असा १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुकेश माणिक जाधव (वय ४५) रा. मलठण, फलटण अनिकेत सुभाष बनसोडे (वय २२) रा. मलठण, फलटण अर्जुन राजु जाधव (वय २०) रा. मलठण, फलटण रोहन लाखन घाडगे (वय २४) रा. यशवंतनगर, वाई
विजय बाबुराव शिंदे (वय ३६) रा. यशवंतनगर, वाई
मनोज नामदेव घाडगे (वय ४०) रा. यशवंतनगर, वाई यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपी क्र. १ ते ३ हे सराईत गुन्हेगार असून आरोपी क्र. २ व ३ यांना फलटण शहर पोलीस ठाण्यातून सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहा. पोलीस निरीक्षक अमोल गवळी, तसेच तपास पथकातील अधिकारी-अंमलदारांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीरीत्या पार पडली.पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांनी वाई गुन्हेप्रकटीकरण विभागाचे विशेष अभिनंदन केले आहे.
