सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत जितेंद्र चंद्रकांत सकुंडे यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे.
उपसरपंच पदाचा तुषार राजकुमार सकुंडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच अँड. हेमंत विलास गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. या झालेल्या निवडीवेळी जितेंद्र चंद्रकांत सकुंडे, अनिता दत्तात्रय दडस आणि निशिगंधा सुजित सावंत यांनी उपसरपंच पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते.
या मतदान प्रक्रियेदरम्यान चुरशीची लढत पाहायला मिळाली. यात जितेंद्र सकुंडे आणि अनिता दडस यांना प्रत्येकी सहा मते मिळाली, तर निशिगंधा सावंत यांना एक मत मिळाले. सकुंडे आणि दडस यांना समसमान मते पडल्याने निर्णायक मतदानाचा अधिकार सरपंचांकडे गेला.
सरपंच अँड. हेमंत गायकवाड यांनी निर्णायक मत जितेंद्र सकुंडे यांच्या बाजूने दिल्याने त्यांच्या मतांची संख्या सात झाली आणि त्यांनी उपसरपंच पदावर विजय मिळवला.या संपूर्ण निवड प्रक्रियेदरम्यान प्रशासकीय कामकाज संजयकुमार भोसले यांनी पाहिले.
निवडीनंतर बोलताना उपसरपंच जितेंद्र सकुंडे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेली विविध विकासकामे अधिक गतीने पुढे नेऊन वाघळवाडी गाव अधिक प्रगत आणि विकसनशील करण्यासाठी कटिबद्धपणे काम करणार आहोत.
