Baramati Crime l ३४ लाखांच्या आर्थिक फसवणुकीचा पर्दाफाश : सहा महिन्यांपासून फरार आरोपी बारामती पोलिसांनी केला जेरबंद

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर पोलिसांनी ३४ लाखांहून अधिक रकमेच्या आर्थिक फसवणुकीचा भंडाफोड करत सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. 314/2025 अन्वये दाखल असलेल्या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय पोपटराव खुळे (रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. मात्र पोलिसांनी गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या जोरावर त्याचा ठावठिकाणा शोधून काढत शिताफीने अटक केली. या प्रकरणात आरोपीने हॉटेल व्यवसायात व्यवस्थापक म्हणून काम करताना ग्राहकांची बनावट नावे नोंदवून, उधारी दाखवून आणि आर्थिक व्यवहारात फेरफार करत तब्बल 34,33,393 रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.
या कारवाईमुळे “गुन्हेगार कितीही चतुर असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही” हा ठोस संदेश समाजात गेला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे आणि पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांनी समन्वयाने काम करत आरोपीच्या अटकेत महत्त्वाची भूमिका बजावली.

सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अपहार झालेली रक्कम व इतर पुरावे जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नागरिकांना आवाहन-
संशयास्पद हालचाली किंवा फसवणुकीची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.
To Top