सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : संतोष माने
सध्या आखाती देशांतील घडामोडींमुळे गॅस टंचाई जाणवत असताना, उद्यापासून पेट्रोल व डिझेल मिळणार नाही अशी अफवा इंदापूर तालुक्यात पसरल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे.
या संदर्भात एका पेट्रोल पंप चालकांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी सध्यातरी पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे सांगितले. मात्र उद्याच्या परिस्थितीबाबत स्पष्ट भाष्य करण्यास त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून गॅस टंचाईमुळे इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्राहकांना गॅस मिळवण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. गॅस केंद्रांवरही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
याच पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेल पुरवठा बंद होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने वाहनधारकांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावल्या आहेत. परिस्थितीबाबत राज्य सरकारने तातडीने स्पष्टीकरण देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
