Pune News l प्रतिकूल परिस्थितीत अधिकारी घडवणाऱ्या माता-पित्यांचा ‘जिजाऊ सन्मान’ सोहळ्यात गौरव

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुणे : प्रतिनिधी
झोपडपट्टी परिसरात राहून रिक्षा चालवणे, मोलमजुरी करणे अशा प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मुलांना उच्च शिक्षण देत न्यायाधीश, पोलीस अधिकारी, तसेच सैन्यदलातील अधिकारी बनवणाऱ्या जिद्दी माता-पित्यांचा आर के बहुउद्देशीय संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ‘जिजाऊ सन्मान सोहळा’ वडगाव बुद्रुक येथील रुक्मिणी व्हिला येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, जेष्ठ समुपदेशक डॉ. दत्ता कोहीनकर, नेहरू युवा केंद्र अध्यक्ष यशवंत मानखेडकर, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिकारी भारत येडे, ॲड. गणेश आळंदीकर, संस्थेचे अध्यक्ष आनंद साळुंखे व सचिव भाग्यश्री साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात प्रतिकूल परिस्थितीत मुलांना अधिकारी बनवणाऱ्या श्रीधर काळे, सुजाता जगताप, लक्ष्मी पढेर, सुमन गाडेकर, निर्मला थोरात, सुनंदा भुतके, सुजाता यशवद, डॉ. रत्नप्रभा पोतदार, एसीपी अनुजा देशमाने, अश्विनी चांगण, उषा पंडित आदींचा गौरव करण्यात आला.
यावेळी भानुप्रताप बर्गे यांनी समाजातील महिलांनी अंधश्रद्धेला बळी न पडता शिक्षणाला प्राधान्य देऊन सजग राहावे, असे आवाहन केले. तसेच तळागाळातील महिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेली मेहनत समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात डॉ. दत्ता कोहीनकर, ॲड. गणेश आळंदीकर, विशाल लोंढे व भारत येडे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेच्या सचिव भाग्यश्री साळुंखे यांनी या उपक्रमामागील उद्देश म्हणजे पडद्याआड राहणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना प्रोत्साहन देणे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजन संतोष गोरे, रूपाली गोरे, प्रणव साळुंखे, सई साळुंखे, ऐश्वर्या साळुंखे, करिष्मा साळुंखे आदींनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन आनंद साळुंखे यांनी केले.
Tags
To Top