सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सातबारा नोंदीचे काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमेश्वर पेट्रोलपंप परिसरातील गायकवाड बिल्डिंगजवळ करण्यात आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ संपत महानवर (वय 35, रा. गडदरवाडी, पोस्ट खंडोबाची वाडी, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 40/2026 अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांच्या सातबारा नोंदी सर्कल कार्यालयातून प्रमाणित करून देण्यासाठी सर्कल अधिकारी मोहिते यांच्यासाठी 20 हजार रुपये व तलाठी जयश्री तनपुरे यांच्यासाठी 5 ते 6 हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार 26 फेब्रुवारी 2026 रोजी वडगाव निंबाळकर येथील सर्कल कार्यालयात पडताळणी करण्यात आली असता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर 4 मार्च 2026 रोजी सोमेश्वर पेट्रोलपंपाजवळील गायकवाड बिल्डिंग परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी सोमनाथ महानवर यांनी पंचांसमक्ष तडजोडीअंती 15 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर करत आहेत.
