सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत सायबर फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवत एका ७४ वर्षीय महिलेला तब्बल ४५ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शकुंतला उद्धव खर्डे (वय ७४ रा. डोर्लेवाडी, ता. बारामती) यांना १४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर WhatsApp द्वारे व्हिडिओ कॉल केला. त्या व्यक्तीने स्वतःचे नाव “संदीप पाटील” असल्याचे सांगत पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. पोलीस गणवेशात व्हिडिओ कॉल करून त्याने विश्वास संपादन केला.
त्यानंतर फिर्यादी यांच्या नावावर अटक वॉरंट असल्याचे सांगून “डिजिटल अरेस्ट” होईल अशी भीती दाखवली. मानसिक दबाव टाकून आरोपीने त्यांना बँकेतील फिक्स डिपॉझिट (FD) तोडण्यास भाग पाडले आणि वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले.
आरोपीच्या सांगण्यावरून फिर्यादी यांनी ३४ लाख ६० आजार आणि ११ लाख अशी मिळून एकूण ४५ लाख ६० हजार रक्कम विविध बँक खात्यांवर वर्ग केली. काही काळानंतर आरोपीशी संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
दरम्यान, प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही स्वतःला पोलीस, CBI, ED किंवा न्यायालयाचा अधिकारी असल्याचे सांगून फोन किंवा व्हिडिओ कॉलवर “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवत पैसे मागितल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारची घटना घडल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी.
कोणतीही संशयास्पद लिंक, OTP, बँक तपशील किंवा वैयक्तिक माहिती अज्ञात व्यक्तींना देऊ नये, असेही पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
