Baramati News l वन्यप्राण्यांसाठी दर आठवड्याला वनविभागात सोडणार पाणी : दिपउजाला फाउंडेशनचा उपक्रम

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
प्रखर उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांची होणारी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन चौधरवाडी, करंजे व कानाडवाडी (ता. बारामती) येथील वनपरिक्षेत्रात दिपउजाला सोशल फाउंडेशनच्या वतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत टँकरद्वारे सुमारे वीस हजार लिटर पाणी टाक्यांमध्ये सोडण्यात आले. याठिकाणी पाण्याच्या पाच टाक्या असून त्या भरल्या गेल्याने वन्यप्राण्यांना दिलासा मिळाला आहे.
                  फाउंडेशनचे अध्यक्ष दिपक साखरे यांनी सांगितले की, उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून वन्यप्राण्यांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. अनेकदा हे प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन दर आठवड्याला पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाघळवाडी, चौधरवाडी, करंजेपुल व करंजे परिसरात शेकडो एकरांवर पसरलेल्या वनपरिक्षेत्रात ससे, चिंकारा जातीची हरणे, तरस, कोल्हे, लांडगे तसेच विविध पक्ष्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. वाढत्या उष्णतेमुळे या सर्व प्राण्यांवर पाण्याअभावी परिणाम होत असल्याने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे. फाउंडेशनच्या वतीने यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून, पुढील काळातही गरज भासल्यास अशा प्रकारे पाण्याची व्यवस्था सुरू ठेवण्यात येणार असल्याचे दिपक साखरे यांनी सांगितले.

 यावेळी वनअधिकारी माया काळे, कर्मचारी नवनाथ रासकार, आकाश साळवे आदी उपस्थित होते. दरम्यान सोमेश्वर परीसरातील विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडूनही दरवर्षी वन्यप्राण्यांच्या पाण्याची सोय करण्यात येत आहे.
To Top