सोमेश्वर रिपोर्टर टीम
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबूत येथील कदम वस्तीतील एका नागरिकाला त्याच्याच दाजीने सात तोळे सोने आणि सुमारे साडेदहा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत संबंधित मेव्हण्याने वडगाव निंबाळकर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे.
गणेश सुरेश कदम रा. निंबुत-कदमवस्ती ता. बारामती यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांच्याकडे दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की, तक्रारदाराची बहीण गौरी हिचा विवाह व्याजवाडी ता. वाई येथील किरण पिसाळ यांच्याशी 2013 साली झाला होता.
जून २०१५ मध्ये गणेश कदम यांच्या वडिलांनी मुलीच्या नावाने सुमारे १० ते १२ लाख रुपये रोख रक्कम तसेच सात तोळे सोने दिले होते. ही रक्कम व सोने घरात ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांनंतर ही रक्कम व दागिने गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर संबंधितांकडून दरमहा ४ हजार ३०० रुपये देण्याचे मान्य करण्यात आले होते. काही काळ ही रक्कम देण्यात आली; मात्र त्यानंतर पैसे देणे बंद करण्यात आल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.
तसेच संबंधित व्यक्तीने जमीन गहाण ठेवून कर्ज घेतल्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचे कारण सांगून उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केली असल्याचेही कदम यांनी नमूद केले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी व आपली रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.
दरम्यान, या अर्जाच्या प्रती पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण, बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच वाई पोलीस स्टेशन यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
