सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर येथील शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (डिप्लोमा कॉलेज) मधील विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. सोमेश्वर साखर कारखाना स्थळावरील कोप्यांवर जाऊन ऊसतोड मजुरांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य आणि 'भाषा साधन' बॅगचे वाटप करण्यात आले.
महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात शिकवल्या जाणाऱ्या 'वैश्विक मानवी मूल्ये' या विषयाची प्रत्यक्ष कृती म्हणून विद्यार्थ्यांनी एकत्र येत लोकवर्गणी जमा केली. या निधीमध्ये शिक्षकांनीही आपला मोलाचा वाटा उचलला. या उपक्रमाचे नियोजन प्राचार्य एस. के. हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
जमा झालेल्या रकमेतून सोमेश्वर कारखाना परिसरातील ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी सुरू असलेल्या शाळेत एकूण ११ हजार रुपयांच्या शालेय साहित्याची भेट देण्यात आली. भाषा साधन साहित्याचे ३ विशेष किट्स, २४ प्रकारचे शालेय उपयोगी साहित्य उजळणी पुस्तके, अंकलिपी, तक्ते, गोष्टींची पुस्तके आणि समाजसुधारकांची चरित्रे यांचा समावेश आहे.
यावेळी शाळेतील मुलांसोबत समन्वयक संतोष शेंडकर, मुख्याध्यापिका गीतांजली बालगुडे, शिक्षक कार्यकर्ते नौशाद भगवान, संभाजी खोमणे उपस्थित होते. त्यांनी मुलांशी संवाद साधून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. तसेच प्रा. एम. ए. भोईटे, प्रा. एम. डी. पोमणे, प्रा. एस. जी. बनकर, प्रा. कु. एम. एम. फरांदे आणि डी. डी. शिंदे यांनी या उपक्रमाच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, सचिव भारत खोमणे, संचालक प्रतिनिधी आनंदकुमार होळकर व सर्व संचालक मंडळाने विद्यार्थी आणि शिक्षकांच्या या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले आहे.
