सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील चंदननगर परिसरात एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. रूममेट्सकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने आपली जीवनयात्रा संपवली आहे. पायल किशोर राजगुरू असे या दुर्दैवी तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मूळची मुळशी येथील असलेली पायल पुण्यात नर्सिंगचा कोर्स करत होती. ती चंदननगरमधील विठ्ठलनगर भागात एका इमारतीत तीन मैत्रिणींसोबत पेइंग गेस्ट (PG) म्हणून राहत होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्या रूममधील सबुरी, शिवानी आणि दीपाली या तरुणींचे पैसे, पर्स आणि मोबाईल चोरीला गेले होते. या चोरीचा आळ या तिघींनी थेट पायलवर घातला.
पायलने आपण चोरी केली नसल्याचे वारंवार सांगितले, मात्र तरीही तिला 'चोर' ठरवून तिचा छळ सुरूच ठेवण्यात आला. इतकेच नव्हे तर, ही चोरीची बाब कॉलेजमध्ये आणि ओळखीच्या लोकांमध्ये पसरवून तिला सामाजिक स्तरावर बदनाम करण्याची धमकीही देण्यात आली. "कोणीही आपल्यावर विश्वास ठेवणार नाही आणि आपली बदनामी होईल," या भीतीपोटी पायल प्रचंड मानसिक तणावाखाली होती. या जाचाला कंटाळून अखेर ९ मार्च रोजी पायलने टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक सुसाईड नोट लिहून ठेवली असून, त्यामध्ये आपल्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांची नावे आणि छळाचा उल्लेख केल्याचे समजते. एका उमद्या तरुणीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने राजगुरू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, संबंधित रूममेट्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
