Indapur Breaking l तहसीलदारांवर हात उचलणाऱ्याची खैर नाही..! महसूल विभागाचे 'लेखणी बंद' आंदोलन!

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
इंदापूर : प्रतिनिधी
शासकीय कर्तव्य बजावत असताना इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. १०) तालुक्यातील महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 'लेखणी बंद' आंदोलन केले. या घटनेमुळे संपूर्ण महसूल यंत्रणेत संतापाची लाट उसळली असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सोमवारी (दि. ९) निमगाव केतकी परिसरात शासकीय कामकाज सुरू असताना वरकुटे खुर्द येथील संतोष रामदास मोरे याने तहसीलदार जीवन बनसोडे यांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. या धक्कादायक प्रकारानंतर तहसीलदार बनसोडे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी इंदापूर प्रशासकीय भवनातील कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. आंदोलक कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, "जर तालुक्याच्या सर्वोच्च महसूल अधिकाऱ्यावरच अशा प्रकारे हल्ला होत असेल, तर सामान्य कर्मचाऱ्यांनी काम कसे करायचे? हा आमच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात महसूल कर्मचाऱ्यांनी खालील मुद्दे मांडले आहेत. तालुक्यात काही स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते खोट्या तक्रारी, धरणे आणि उपोषणाच्या धमक्या देऊन शासकीय यंत्रणेवर दबाव आणत आहेत. शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या आणि अधिकाऱ्यांवर हात उचलणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर मोक्का किंवा तत्सम कठोर कलमान्वये कारवाई व्हावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी शासनाने सुरक्षिततेची हमी द्यावी. 

या आंदोलनात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, गावकामगार आणि महसूल विभागातील सर्व संवर्गातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या संपामुळे मंगळवारी तहसील कार्यालयातील जनसामान्यांची कामे खोळंबली होती, मात्र कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीवर ठाम राहत तीव्र निषेध नोंदवला.

•अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची करणाऱ्या अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. आरोपीला कठोरात कठोर शासन होईपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहील.
— आंदोलक महसूल कर्मचारी संघटना, इंदापूर.
To Top