Satara News l पदोन्नतीसाठी ३ लाख मागितले..!खटावच्या ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एसीबीच्या ताब्यात.

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
खटाव : प्रतिनिधी 
पदोन्नतीच्या बदल्यात लाच मागणाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयातील एका सहयोगी प्राध्यापकाची पदोन्नती करण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताना एका खासगी व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले.
 या प्रकरणात खटावच्या चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि एका ग्रंथालय परिचरालाही ताब्यात घेण्यात आले असून परिसरात खळबळ उडाली आहे. यातील तक्रारदार हे शहाजीराजे महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना प्राध्यापक पदावर पदोन्नती हवी होती. 
त्यासाठी समितीचे अध्यक्ष म्हणून शिवाजी विद्यापीठात उपस्थित राहणे किंवा प्रतिनिधी नियुक्तीचे पत्र देण्यासाठी रवींद्र गणपत पवार (रा. खटाव) या खासगी व्यक्तीने ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच संस्थेचे अध्यक्ष अजित रामचंद्र पाटील यांच्यासाठी असल्याचे सांगण्यात आले होते. लाचेच्या या मागणीला ग्रंथालय परिचर अनिल सदाशिव गुजर यांनीही प्रोत्साहन दिल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे रवींद्र पवार याने ३ लाख रुपये स्वीकारताच पथकाने त्याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर संस्थेचे अध्यक्ष अजित पाटील आणि अनिल गुजर यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पुसेगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे, पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे, गणेश ताटे, निलेश राजपुरे, प्रियांका जाधव आणि अजयराज देशमुख यांच्या पथकाने यशस्वी केली.
To Top