Baramati Accident News l काळाचा घाला..! ड्युटी संपवून घरी परतणाऱ्या ग्रामसेवकाला अज्ञात वाहनाची धडक; जळगाव क.प. जवळ घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
मोरगाव : प्रतिनिधी 
बारामती तालुक्यातील जळगाव क.प. गावाजवळ राज्य मार्गावर सोमवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात मेडद ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मधुकर धोंडीबा जगताप (वय ६०, रा. भिलारवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री ९ च्या सुमारास एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर जगताप हे मेडद ग्रामपंचायतीचे काम आटोपून रात्री आपल्या घरी भिलारवाडीकडे निघाले होते. जळगाव क.प. गावाच्या हद्दीत येताच एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला पाठीमागून भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची बातमी समजताच जळगाव क.प. आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. या राज्य मार्गावर सातत्याने होणारे अपघात आणि गतिरोधकांचा अभाव यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते. संतप्त जमावाने रस्त्यावर उतरून 'रास्ता रोको' आंदोलन केले. वारंवार मागणी करूनही प्रशासन या ठिकाणी गतिरोधक बसवत नसल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला. आंदोलनाची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती हाताळली. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.

दरम्यान, अपघात करून पळून गेलेल्या वाहनाचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागला असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, माळेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत. 
एक कर्तव्यदक्ष आणि मनमिळावू अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मधुकर जगताप यांच्या निधनामुळे भिलारवाडी आणि मेडद गावावर शोककळा पसरली आहे.
To Top