सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
ज्यांच्या हातांनी आजवर केवळ ऊस तोडणी पाहिली, त्याच हातांनी आज साखर कारखान्याचे अवाढव्य यंत्र आणि साखर निर्मितीची प्रक्रिया जवळून अनुभवली. प्रकल्प समन्वयक संतोष शेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, कोपीवरील शाळेतील १२२ विद्यार्थ्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला शैक्षणिक भेट दिली.
या ऐतिहासिक भेटीसाठी कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, संचालक ऋषिकेश गायकवाड, सचिव कालिदास निकम, चीफ केमिस्ट शिवकुमार भोसले, लेबर ऑफिसर रणवरे आणि सभासद नारायण भोसले यांनी विशेष उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
इयत्ता १ ली ते ८ वी मधील या मुलांसाठी हा अनुभव अत्यंत भावनिक होता. अनेक मुलांचे बालपण ऊस तोडणीच्या फडात कष्टात गेले आहे. मात्र, पहिल्यांदाच त्यांना तो ऊस कारखान्यात गेल्यावर त्याची साखर कशी होते, हे प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी ऊस गाळपापासून ते पांढरीशुभ्र साखर तयार होण्यापर्यंतची संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया उत्साहाने समजून घेतली. कारखान्याच्या वतीने मुलांसाठी नाश्त्याचीही सोय करण्यात आली होती. केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान पाहायला मिळाले.
प्रकल्प समन्वयक संतोष शेंडकर, नौशाद बागवान, संभाजी खोमणे, संतोष होनमाने, आरती गवळी, अनिता ओव्हाळ, अश्विनी लोखंडे, समीक्षा गडदरे, साक्षी ओव्हाळ, नितीन मोरे, विकास देवडे या संपूर्ण टीमने या भेटीचे नेटके नियोजन केले होते. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही भेट एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
