Daund Breaking l जमिनीच्या वादातून गोळीबार..! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : केडगाव स्टेशन परिसरातील घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
केडगाव : प्रतिनिधी 
केडगाव स्टेशन परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. एका स्थानिक गृहनिर्माण संस्थेच्या शेजारी जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे जेव्हा सर्वत्र शांतता होती, तेव्हा अचानक गोळीबाराच्या आवाजाने परिसर दणाणून गेला. लोकवस्तीच्या मध्यभागी ही घटना घडल्याने नागरिक भीतीने घराबाहेर पडले. 
पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीने जमिनीच्या जुन्या वादातून हा गोळीबार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप मिळालेले नाही, मात्र भरवस्तीत झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला असून, संशयित आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक साक्षदारांच्या माध्यमातून अधिक तपास करत आहेत. 

भरवस्तीत आणि पहाटेच्या वेळी अशा प्रकारे गोळीबार झाल्याने केडगाव परिसरात संताप आणि भीती व्यक्त केली जात आहे. गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
Tags
To Top