सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर पंचायत समितीत कार्यालयीन वेळेत अधिकारी गैरहजर असल्याचा प्रकार समोर आल्याने नाराजी व्यक्त करत जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जगदाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
शुक्रवार (दि. १३) रोजी नागरिकांच्या कामांसाठी प्रवीण जगदाळे पंचायत समिती कार्यालयात गेले असता गटविकास अधिकाऱ्यांसह इतर सर्व जबाबदार अधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले.
याबाबत चौकशी केली असता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच इतर अधिकारी एका जिल्हा परिषद सदस्यांच्या खाजगी कार्यालयात शासकीय दप्तर घेऊन आढावा बैठकीसाठी गेल्याची माहिती समोर आली.
कार्यालयीन वेळेत पंचायत समितीत कोणताही अधिकारी उपस्थित नसल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. एखाद्या सदस्याने कार्यालयीन वेळेत खाजगी कार्यालयात बैठक घेणे अयोग्य असल्याची प्रतिक्रिया प्रवीण जगदाळे यांनी व्यक्त केली.
यावेळी ज्ञानेश्वर शिंदे, अविनाश आवाळे, गजानन आवाळे, चंद्रकांत बांदल, सूर्यकांत माने आदी उपस्थित होते.
