सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये १३ मार्च २०२६ रोजी महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी 'महिला आरोग्य जनजागृती व्याख्यान' आणि 'हिमोग्लोबिन तपासणी शिबीर' उत्साहात पार पडले.
कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा खोमणे (MBBS, DGO) उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांना महिला आरोग्याचे महत्त्व, योग्य आहार आणि शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित ठेवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, ॲनिमिया (रक्तक्षय) टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यावर त्यांनी विशेष भर दिला. याच निमित्ताने आयोजित हिमोग्लोबिन तपासणी शिबिरात वाघळवाडी उपकेंद्राचे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर डॉ. संग्राम कोकरे (CHO) आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने सहभाग घेतला. या शिबिरात महाविद्यालयातील सुमारे १०० विद्यार्थिनी व महिला प्राध्यापकांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली आणि त्यांना आरोग्याविषयक आवश्यक सल्ला देण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे नियोजन समन्वयक डॉ. स्मिता पाटील यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कावेरी धुमाळ यांनी केले, तर प्रतिमा शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सलोनी शाह, भाग्यश्री तुळसे, श्रद्धा भगत, आकांक्षा गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे महिला आरोग्याबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत झाली.
