सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बीड : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, गेल्या तीन-चार दिवसांपासून बीड जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इंधन टंचाईच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, ही गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कंबर कसली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्हा पुरवठा विभागाने इंधनाचा तुटवडा भासू नये यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी ६ मार्च रोजी BPCL, IOCL आणि HPCL या प्रमुख पेट्रोल कंपन्यांच्या जिल्हा समन्वयक व विक्री अधिकाऱ्यांना पत्र पाठवून जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा किमान राखीव साठा (Buffer Stock) कायम ठेवण्याचे सक्त आदेश दिले आहेत. केवळ कंपन्यांनाच नाही, तर जिल्ह्यातील सर्व प्रमुख तालुक्यांच्या तहसीलदारांनाही या संदर्भात सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. यात प्रामुख्याने खालील तालुक्यांचा समावेश आहे: बीड, गेवराई, अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, केज, वडवणी, परळी, शिरूर कासार, आष्टी आणि पाटोदा प्रशासनाने पत्राद्वारे स्पष्ट केले आहे की, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी इंधन व्यवस्था विस्कळीत होऊ न देणे ही काळाची गरज आहे. साठा अनिवार्य प्रत्येक पेट्रोल पंपावर त्यांच्या दैनंदिन विक्रीचा अंदाज घेऊन किमान राखीव साठा ठेवणे बंधनकारक असेल.
नोंदणी आणि तपासणी: साठ्याची नोंद अद्ययावत ठेवून ती तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावी लागेल. शासकीय यंत्रणेला प्राधान्य आपत्कालीन परिस्थितीत शासकीय वाहने आणि अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने इंधन पुरवठा करावा लागेल.
• जर कंपन्यांनी किंवा पंप चालकांनी या सूचनांचे पालन केले नाही, तर प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
