सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सातारा : प्रतिनिधी
देशात नावाजलेल्या साताऱ्यातील एका प्रतिष्ठित शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील वॉर्डबॉयने तीन अल्पवयीन मुलांसोबत अश्लील वर्तन करून त्यांच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ऋषीकेश सुभाष चव्हाण (मूळ रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर; सध्या रा. सदर बाजार, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित वॉर्डबॉयचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना २५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान आणि ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ६:३० च्या सुमारास घडली. संशयित चव्हाण याने शाळेतील तीन मुलांसोबत अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. मुले घाबरल्यानंतर त्याने ही बाब कोणालाही न सांगण्यासाठी त्यांना धमकावले. इतकेच नव्हे तर, त्याने मुलांना मारहाण देखील केली. या मारहाणीत मुलांचा हात पिरगळला असून त्यांचे डोकेही आपटण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा धक्कादायक प्रकार मुलांनी शाळा प्रशासनाच्या कानावर घातल्यानंतर प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलली. शाळेतीलच एका जबाबदार पदाधिकाऱ्याने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
मिळालेल्या तक्रारीवरून सातारा शहर पोलिसांनी संशयित ऋषीकेश चव्हाण याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (पोक्सो) आणि मारहाणीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
