Baramati News l बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे, तर उपसभापतीपदी शुभांगी आगवणे यांची निवड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बारामती : प्रतिनिधी 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या आणि संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी सांगवी येथील किरण रावसाहेब तावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपसभापती पदाची धुरा गुणवडी गणातील शुभांगी सुनील आगवणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीचे विशेष महत्त्व असल्याने या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ही निवड उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. किरण तावरे हे पणदरे गणातून निवडून आले असून, त्यांना स्थानिक राजकारणाचा मोठा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून 'संजय गांधी निराधार योजना' समितीचे अध्यक्ष म्हणून प्रभावी काम केले आहे. त्यांच्या पत्नी मीनाक्षी तावरे यांनीही जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले आहे. तावरे यांचे संघटन कौशल्य आणि कामाचा अनुभव लक्षात घेऊनच त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना नवनियुक्त सभापती किरण तावरे म्हणाले की, "बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे हे माझे मुख्य उद्दिष्ट असेल. शेतकरी, महिला आणि युवकांसाठीच्या सरकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पंचायत समितीचे दरवाजे सदैव उघडे राहतील.

या निवडीमुळे बारामती तालुक्यातील राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात ग्रामीण विकासाचे नवे पर्व सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
To Top