सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबवडे खोऱ्यातील करंजे ता.भोर येथील शिवारात कलिंगड लागवड केलेल्या शेतात काम करीत असताना अचानक झालेल्या अवकाळी पावसाच्या गारपिटीने झोडपल्याने कलिंगड शेतीचे मोठे नुकसान झाले.तर गारपीट सुरू असताना शेतकऱ्याला गारांचा मारा लागल्याने शेतकऱ्याची तब्येत खालावून राजेंद्र लक्ष्मण कुडले (वय - ४९ रा.करंजे ) येथील शेतकऱ्याचा सोमवार दि.३० मृत्यू झाल्याची घटना घडली.
तालुक्यात जोरदार वाऱ्यासह अवकाळी बरसलेल्या गारपिटमुळे वीसगाव,चाळीसगाव तसेच पूर्वपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले.जवळजवळ दोन तास सुरू असलेल्या गारपीट पावसामुळे शेतांमध्ये गारांचा खच साचला होता.
क्षणभरात आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना पळताभुई थोडे झाले होते. अनेकांनी गारपीट च्या पावसातून जीव वाचवण्यासाठी झाडाझुडपांचा तर शेतात बांधलेल्या पत्र्याच्या शेडचा आधार घेतला. दोन तासात बरसलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे पिकांचे होत्याचे नव्हते होऊन बसले. अनेकांच्या शेतात कापणी केलेल्या पिकांमध्ये पाणी शिरले तर काहींची उभी पिके जोरदार वाऱ्यामुळे भुईसपाट झाली. करंजे येथील शेतकरी कलिंगडाच्या शेतात काम करीत असताना शेतातून बाहेर पडणे अगोदरच गारांच्या पावसाचा जोरदार मारा लागला. यात राजेंद्र पुढले यांची अचानक तब्येत खालावली.त्यांना उपचारासाठी भोर येथे दाखल करण्यासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा आकस्मित मृत्यू झाल्याची घटना घडली. गारांच्या माऱ्यामुळे मृत झालेल्या शेतकऱ्याला शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी भोर तालुक्यातील शेतकरी संघटनांकडून होत आहे.
