सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर नगरपरिषद हद्दीत माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून कोट्यवधींची विकास कामे मागील पंचवार्षिकला मंजूर करण्यात आली होती. त्यातील बहुतांशी विकासकामे पूर्ण झाली असून काही उर्वरित कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.प्रलंबित विकासकामे तात्काळ मार्गी लावणार असून पर्यटनाच्या दृष्टीने माजी आमदार थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली भोर शहराचा विकास साधणार असल्याचे मत उपनगराध्यक्ष ॲड.जयश्री शिंदे यांनी व्यक्त केले.
भोर नगरपरिषदेतील श्री छत्रपती संभाजी महाराज सभागृहात बुधवार दि.२५ नूतन कार्यकारणीच्या झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेनंतरच्या पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष शिंदे बोलत होत्या.सर्वसाधारण सभेत बहुतांशी नवनवीन विषयांवर चर्चा करून अनेक विषयांना मंजुरी घेण्यात आली.यावेळी पूर्वी पारित झालेले महत्वाचे रामबाग येथील नवीन जलतरण तलावास राजमाता जिजाऊ तर एसटी बस स्थानक येथील व्यापारी संकुलास श्री छत्रपती
संभाजी महाराज नामकरण करणे प्रार्थनास्थळे, मंदिरे,
दफनभूमी स्थळांचा घेण्यात येणारा कर माफीबाबत समायोजन करण्यात आल्याचे ठराव पारित करण्यात आला आहेत.त्याबरोबरच शहरातील पर्यटनाच्या दृष्टीने अर्धवट राहिलेली विकास कामे शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत असेही शिंदे म्हणाल्या. यावेळी गटनेते अमित सागळे,नगरसेवक सुमंत शेटे,नगरसेवक जगदीश किरवे,प्रशांत जाधव तौसीफ आतार,जयवंत शेटे,रेणुका बदक,स्नेहल घोडेकर,तृप्ती सुपेकर,मनिषा पवार पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
पर्यटनाला चालना देणार भोर शहरात अनेक पर्यटन स्थळे आहेत.त्यांचे सुशोभीकरण लवकरात लवकर करण्यात येणार असून शहरात भोरेश्वर देवस्थान तसेच जानुबाई मंदिर देवस्थान पुरातन काळातील मंदिरे आहेत. त्यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा याचा ठराव पारित झालेला असून याचा प्रस्ताव तीर्थक्षेत्र मिळणे कामी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.निधी प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे गटनेते अमित सागळे यांनी सांगितले.
