Crime News l चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलींना रात्रभर उलटे टांगले; एका चिमुरडीचा तडफडून मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सांगली : प्रतिनिधी 
सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे एका बापाने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. चोरीच्या संशयावरून आपल्या दोन अल्पवयीन मुलींना रात्रभर घरात खुंटीला उलटे लटकवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अमानवी छळामुळे एका मुलीचा तडफडून मृत्यू झाला असून, दुसरीची प्रकृती चिंताजनक आहे.
याप्रकरणी निर्दयी बाप दादू यमगर याला आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यमगर यांच्या शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाने त्यांच्या मुलींवर चोरीचा संशय व्यक्त केला होता. यामुळे संतप्त झालेल्या दादू यमगर याने आपली १० वर्षांची मुलगी सानिका आणि १३ वर्षांची मुलगी अनुजा यांना घरात रात्रभर खुंटीला पाय बांधून उलटे टांगून ठेवले. दोन्ही चिमुरड्या रात्रभर वेदनेने विव्हळत होत्या. त्या 'पाणी, पाणी' म्हणून आर्त हाक देत होत्या, मात्र पाषाणहृदयी आई-वडिलांना त्यांची साधी दयाही आली नाही. त्यांनी मुलींना पाण्याचा एक थेंबही दिला नाही. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मुली वर उलटी टांगलेल्या अवस्थेत वेदनेने तडफडत असताना, हे निर्दयी आई-वडील खाली शांतपणे झोपले होते.

असह्य वेदनांमुळे सानिका हिने मध्यरात्रीच आपला प्राण सोडला. गुरुवारी सकाळी मुलींच्या आजोबांनी त्यांना पाहिले आणि तत्काळ खाली उतरवले. मात्र, तोपर्यंत सानिकाचा मृत्यू झाला होता. अनुजाची प्रकृती अत्यंत गंभीर असून तिच्यावर आटपाडी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या क्रूर घटनेने संपूर्ण आटपाडी तालुका सुन्न झाला आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक विनायक बहिर यांनी सांगितले की, अद्याप अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही, तरीही पोलिसांनी आरोपी बाप दादू यमगर याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
To Top