बारामती | 'प्रिझ्मा आय केअर' हॉस्पिटलमध्ये १५ लाखांची चोरी; अज्ञात चोरट्याचा पोलिसांकडून शोध सुरू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत भिगवण रोडवरील संगवी टाऊनशिप परिसरात असलेल्या “प्रिझ्मा आय केअर” हॉस्पिटलमध्ये अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी केली. शुक्रवारी (दि.१३) पहाटे सुमारे ६.२० वाजण्याच्या सुमारास मुख्य दरवाजाच्या लॉकजवळील ग्रॅनाईट चौकट तोडून आत प्रवेश करत हॉस्पिटलमधील ड्रॉवर उचकटून १५ लाख रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे.
घटनेतील आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील CCTV फुटेज तपासणे, तांत्रिक तपास आणि विशेष पथकाच्या माध्यमातून शोधमोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरातील नागरिक, व्यापारी, हॉस्पिटल, क्लिनिक व व्यावसायिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. शक्यतो मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कार्यालय किंवा दुकानात न ठेवणे, परिसरात कार्यरत CCTV कॅमेरे बसविणे, सुरक्षित लॉकिंग व अलार्म सिस्टीम वापरणे तसेच संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बारामती शहर पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशन किंवा आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.
To Top