Pune News l झेडपी अध्यक्षपदासाठी करण खलाटे प्रबळ दावेदार..! बारामतीला संधी मिळणार? सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बारामती : प्रतिनिधी 
पुणे जिल्हा परिषदेच्याअध्यक्ष पदाची निवड (दि.१८) मार्चला होणार आहे. विशेषतः बारामती पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे हे सध्या प्रबळ दावेदार मानले जात आहेत. अध्यक्ष व न विविध विभागांच्या सभापतीनिवडीचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्या या पदावर कोणाला संधी देतात, याकडे लक्ष लागले आहे.
(स्व)उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामती तालुक्याला हे पद मिळावे, अशी मागणी बारामतीकरांकडून होत आहे. अजित पवार हे गेली अडीच दशके जिल्हा परिषदेवर कोणाला संधी द्यायची याचा निर्णय घेत होते. त्यांच्याच नेतृत्वात जिल्हा परिषदेची भव्य इमारत उभारली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा. बदलण्याचे काम पवार यांनी केले. आता त्यांच्या पश्चात विकासाला काहीअंशी ब्रेक लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात बारामतीला संधी मिळावी, अशी मागणी केली जात आहे.
 करण खलाटे हे निंबूत कांबळेश्वर गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. ते सध्या झेडपीच्या अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. त्यांनी पक्षाकडे तशी इच्छाही व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री पवार या अंतिम निर्णय घेणार आहेत. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. या स्थितीतबारामतीला हे पद मिळाल्यास विकासाचा वेग कायम राखण्यास मदत होणार आहे.

पंचायत समितीच्या कार्यकाळात ठसा
खलाटे यांनी पंचायत समिती सभापतिपदाच्या कार्यकाळात कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क, तरुण नेतृत्व म्हणूनही वेगळी ओळख आहे. बारामती तालुक्यातून संपतराव देवकाते, योगिता कोकरे, सतीश खोमणे, विश्वास देवकाते या चौघांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. विशेष म्हणजे खलाटे यांच्याकडे हे पद आल्यास ग्रामीण भागाच्या विकासाचा वेग कायम राहणार आहे, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.

अध्यक्षपदाच्या शर्यतीत जोरदार रस्सीखेच
दरम्यान, जिल्हा परिषदेत विविध तालुक्यांतील प्रतिनिधित्वाचा समतोल राखण्याची परंपरा लक्षात घेता अध्यक्षपदाच्या स्पर्धेत इतर तालुक्यांतील इच्छुकही सक्रिय झाले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची शर्यत आता अधिकच चुरशीची झाली आहे. मात्र, सध्या तरी बारामतीला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळणार का, याबाबत चर्चा सुरू आहेत.
Tags
To Top