Baramati News l वाणेवाडीत ईद होणार साधेपणाने साजरी : अजित पवारांच्या निधनाचे सावट

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुःखद निधनामुळे संपूर्ण राज्यासह बारामती तालुक्यात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील मुस्लिम जमातीतर्फे यंदाची रमजान ईद अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुस्लिम समाजामध्ये रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात धार्मिक वातावरण असते आणि महिन्याच्या शेवटी येणारी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. 
दरवर्षी सर्व धर्मीय नागरिकांना सहभागी करून ईद आनंदाने साजरी केली जाते. मात्र यंदा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकस्मिक निधनामुळे गावातील मुस्लिम बांधवांनी ईद साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कोणताही गाजावाजा, बॅनरबाजी, डेकोरेशन किंवा ईद मिलन कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. फक्त धार्मिक विधी व ईदची नमाज अदा करून सण साजरा केला जाणार आहे.

या संदर्भातील बैठकीला नुरमहमद तांबोळी, शेखलाल आतार, शफीक मुलाणी, शौकत शेख, शहाबुद्दीन बागवान, पठाण, मणेर, डांगे आदी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
यावेळी अख्तर सिकीलकर व शफीकभाई यांनी आपले विचार मांडले. तसेच अजितदादा पवार यांनी सर्व धर्मीयांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल केली असल्याने त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
To Top