Baramati Accident l वडिलांनंतर घराची जबाबदारी उचललेल्या सुशीलचा दुर्दैवी मृत्यू : दोन वर्षांचा चिमुकला पोरका

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
कामावर जात असताना निंबुत येथे झालेल्या भीषण अपघातात करंजेपूल ता. बारामती येथील तरुण सुशील दत्तात्रय ठोसर (वय ३५) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. आज दुपारी ४ वाजता करंजेपूल येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुशील ठोसर हे गुरुवारी सकाळी ७ वाजता आपल्या दुचाकीवरून निरेच्या दिशेने कामासाठी निघाले होते. लक्ष्मीनगर (निंबुत) परिसरात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. 
या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने बारामती आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सुशील हे पुणे येथील एका दुकानात रोजंदारीवर काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असून त्याला राहते घर देखील नाही. घर बांधण्याचे त्याचे नवीन स्वप्न अपूर्णच राहिले. 

‌त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या  सहकाऱ्यांनी  दुःख व्यक्त केले. सुशील यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन वर्षांचा लहान मुलगा असा परिवार आहे. त्यांची आई भाजी विक्री करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहास हातभार लावत होत्या. कुटुंबातील कर्ता तरुण मुलगा गेल्याने ठोसर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
To Top