सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पाटस : प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या बगॅस डेपोला आज, सोमवारी (दि. ३०) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत बगॅस भरण्यासाठी उभा असलेला एक ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या परिसरातील बगॅसच्या साठ्याला सकाळी अचानक आग लागली. वाऱ्यामुळे काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. यावेळी बगॅस भरण्यासाठी तिथे उभा असलेला ट्रक आगीच्या विळख्यात सापडला आणि पाहता पाहता जळून खाक झाला. आगीचे लोट आणि धुराचे लोट दूरवर दिसत होते, ज्यामुळे परिसरात नागरिकांची मोठी धावपळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सद्यस्थितीत दोन अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
