सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
उरुळी कांचन : प्रतिनिधी
सोरतापवाडी - आळंदी म्हातोबा शिवेवरील गुंजाळमळा परिसरात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या एका २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी (दि. २९) दुपारी अडीच ते पावणे तीन वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना उघडकीस आली.
इस्माईल शेख (वय २०, रा. मगरवस्ती, आळंदी म्हातोबा) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्माईल हा आपल्या स्थानिक मित्रांसह परिसरातील एका विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना अचानक दम कोंडल्याने तो पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. इस्माईल पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले, मात्र तोपर्यंत तो खोल पाण्यात बुडाला होता. दुर्दैवाने नागरिकांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे आणि पोलीस हवालदार सुपेकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने इस्माईलचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला आहे. ऐन तरुण वयात मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने मगरवस्ती परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
