सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
अनैतिक संबंधातून एका २५ वर्षीय महिलेचा दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगदा परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, जंगलात टाकलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
मनीषा खम्म दमाई (वय २५, रा. नऱ्हे, मूळ रा. नेपाळ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रकाश अर्जुन तिखात्री (वय ३०, रा. हिंजवडी, मूळ रा. नेपाळ) याला अटक केली आहे. मनीषाचा भाऊ किशन भरत परिहार (वय ३५) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मनीषा, आरोपी प्रकाश आणि फिर्यादी किशन हे सर्व मूळचे नेपाळचे रहिवासी असून पुण्यात रखवालदार (वॉचमन) म्हणून काम करतात. प्रकाश आणि मनीषा हे दोघेही विवाहित असून त्यांचे एकमेकांशी अनैतिक संबंध होते. मात्र, गेल्या काही काळापासून प्रकाशला हे संबंध संपवायचे होते, तर मनीषा त्यास तयार नव्हती. याच कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते.
या वादातून सुटका करून घेण्यासाठी प्रकाशने मनीषाचा काटा काढण्याचे ठरवले. १८ मार्च रोजी तो मनीषाला बहिरवाडी भिलारवाडी येथील जंगलात घेऊन गेला. तिथे त्याने दोरीने तिचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह झुडपांत टाकून दिला. मनीषा बेपत्ता झाल्याने तिचे नातेवाईक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. तपासादरम्यान पोलिसांना प्रकाशवर संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला सोबत घेऊन भिलारवाडीचे जंगल गाठले, जिथे त्याने घटनास्थळ दाखवले. भावाने मनीषाचा मृतदेह ओळखला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली
