सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
दौंड : प्रतिनिधी
कत्तलीसाठी गायी नेल्या जात असल्याच्या संशयावरून टेम्पोचालकाला आणि त्याच्या साथीदारांना बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना दौंड शहरात घडली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी टेम्पोचालक शाहरूख नूर शेख (रा. लोहियानगर, स्वारगेट, पुणे) हा २७ मार्च रोजी दुपारी भरतगाव (ता. दौंड) येथून नऊ गायी घेऊन चापडगाव (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) कडे निघाला होता. त्याच्यासोबत गायी विकत घेणारा व्यक्ती आणि एक मित्रही टेम्पोमध्ये होते.
रात्रीच्या वेळी अष्टविनायक मार्गाने जाण्याऐवजी रस्ता चुकल्यामुळे हा टेम्पो दौंड शहरातील भाजी मंडईच्या दिशेने वळाला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या तरुणांनी टेम्पो अडवला आणि गायी कत्तलीसाठी नेल्या जात असल्याचा संशय व्यक्त करत वादावादी सुरू केली. चालकाने या गायी विकत घेतल्या असून त्या चापडगावला पोहोचवण्यासाठी जात असल्याचे स्पष्ट केले. मात्र, तरीही आरोपींचे समाधान झाले नाही. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपींनी चालकाला आणि त्याच्या साथीदारांना दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर, फिर्यादीच्या खिशातील १३०० रुपये काढून घेत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
शाहरूख शेख याने दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये रुद्राक्ष लवटे (रा. गोपाळवाडी, दौंड, सुरेश पालवे (रा. गोपाळवाडी, दौंड,
सोनू थोरात (रा. भाजी मंडई, दौंड, संकेत दळवी (रा. मोरे वस्ती, लिंगाळी, दौंड, आणि एक अनोळखी तरुण यांचा समावेश आहे.
पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (घातक शस्त्रांनी दुखापत करणे), ११९-१ (मालमत्ता हडपण्यासाठी दुखापत करणे), १८९-२ (बेकायदेशीर जमाव करणे) आणि १९१-२ (दंगा करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
