सुपे परगणा l सुपे येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला..

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सुपे : दिपक जाधव 
सुपे येथील पुजा गार्डन मंगल कार्यालयात महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ मासूम या संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मासूम संस्थेच्या सहसंयोजक मीना शेंडकर होत्या. तर प्रमुख पाहुण्या म्हणून शक्ती बॉक्स टीमच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल वनिता कदम होत्या. 
यावेळी ज्योती म्हापसेकर लिखित मुलगी झाली हो..हे नाटक मासूम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले. मुलगा मुलगी भेदभाव न करता महिलांनी नोकरी व्यवसाय केले पाहिजेत. तर त्या सक्षम होतील असा संदेश या नाटकामधून दिला आहे. 
मुले व पालक यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संवाद असला पाहिजे. सोशल मीडियावरून महिला आणि मुलींचा लैंगिक छळ होत असेल तर मदत घेतली पाहिजे. त्यासाठी आम्ही मदत करू असे आश्वासन शक्ती बॉक्स टीमच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल वनिता कदम यांनी महिलांशी बोलताना दिले.  
महिलांवर होणारी हिंसा व त्यातून महिलांच्या होणाऱ्या हत्या व आत्महत्या थांबल्या पाहिजेत, त्यासाठी महिलांनी संघटित राहिले पाहिजे. हिंसा करणार नाही, हिंसा होऊ देणार नाही आणि हिंसा होत असेल थांबविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी हिंसामुक्त, भेदभावमुक्त आणि सुरक्षित वातावरण निर्माण केले पाहिजे असे मत कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या मासूम संस्थेच्या सहसंयोजक जयश्री नलगे यांनी मांडले. मासूम संस्थेच्या सहसंयोजक मीना शेंडकर यांनी महिलांवरील हिंसा थांबवायची असेल तर त्यांना संपत्तीत मुलांइतकाच समान वाटा दिला पाहिजे. तसेच घर आणि शेतीवर महिलांची नावं लावली पाहिजेत असे मत शेंडकर यांनी व्यक्त केले. 

यावेळी जातीव्यवस्था आणि पितृसत्तेच्या चौकटीबाहेर जाऊन काम करणाऱ्या व्यक्तींचा संस्थेतर्फे सन्मान केला जातो. त्यामुळे आकाश चव्हाण आणि पूजा या जोडप्याचा कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्याकामी ज्योती चौंडकर, सुप्रिया सांगळे आणि मासूम संस्थेच्या कार्यकर्त्यां आदीनी परिश्रम घेतले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी खेत्रे, पंचायत समिती सदस्या उज्वला खैरे, सुप्याच्या उपसरपंच नयना जगताप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मालन झगडे यांनी केले. सूत्रसंचालन कावेरी कुंभारकर यांनी केले. स्वागत सोनाली चांदगुडे यांनी केले. तर आभार प्रतीक्षा सकट यांनी मानले. 
    
To Top