Phaltan Breaking l भरधाव एसटीची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू : तांबवे येथील घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
लोणंद :  प्रतिनिधी
लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत तांबवे (ता. फलटण) येथील भैरवनाथ मंगल कार्यालयासमोर लोणंद-सातारा डांबरी रस्त्यावर बुधवारी (दि. 11) सायंकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या सुमारास एसटी बस व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
याबाबत लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपर्डे (ता. खंडाळा) येथील नामदेव राघू बोडरे (वय 55) हे मोटरसायकल (MH-04-AU-5688) वरून जात असताना समोरून येणाऱ्या एसटी बस (MH-14-BT-4672) ने धडक दिली. या धडकेत बोडरे खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी नेण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी दशरथ भगवान बोडरे (वय 46, रा. कोपर्डे, ता. खंडाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एसटी चालक प्रमोद रामचंद्र राजमाने (वय 42, रा. खंडाळा, जि. सातारा) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे व भरधाव वाहन चालवून अपघात घडवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार क्षीरसागर करीत असून, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
To Top