Phaltan Breaking l अंघोळीसाठी कॅनॉलच्या पाईपमध्ये उतरलेल्या तीन मजुरांचा बुडून मृत्यू : हिंगणगाव येथील घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम---
लोणंद : प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील हिंगणगाव गावच्या हद्दीत खानविलकर फार्मजवळ हिंगणगाव–आदर्की रस्त्याखाली असलेल्या कॅनॉलच्या सिमेंट पोटपाटाच्या पाईपमध्ये बुडून तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 12 मार्च 2026) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली.
मृतांमध्ये ज्योर्तिमय भगिरथी नाईक (वय 22), सतिन बिरची नाईक (वय 35) व श्रीराम जगाई हेबरंम (वय 20) यांचा समावेश असून तिघेही प्रिमियम चिक फिड प्रा. लि., सुळवस्ती, हिंगणगाव येथे मजुरीचे काम करत होते. तिघेही मूळचे ओरिसा राज्यातील रहिवासी आहेत.
कॅनॉलचे पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या पोटपाटाच्या सिमेंट पाईपमध्ये पाणी साचलेले असताना हे मजूर त्यामध्ये अडकले व बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार  हे तिघेजण याठिकाणी पोहायला गेले होते.

या घटनेची खबर शाम बाळु भगत (वय 39, व्यवसाय खाजगी नोकरी) यांनी दिली आहे. या प्रकरणी लोणंद पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक हेगडे करीत आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कॅनॉलच्या पोटपाटामध्ये पोहत असताना रस्त्याखालून जाणाऱ्या सिमेंटच्या पाईपलाईनमधून कोण पोहत जाऊ शकतो, याबाबत मजुरांमध्ये सुरू होती. त्याचदरम्यान पाईपलाईनमध्ये पाणी भरलेले असताना आत प्रवेश केल्याने हे तिघेही मजूर पाईपमध्ये अडकले व बुडाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, घटनेचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार असून याबाबतचा पुढील तपास लोणंद पोलीस स्टेशन करीत आहे.
To Top