Pune Crime l एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला..! हल्लेखोर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एकतर्फी प्रेमातून कॉलेजबाहेर रक्ताचा थरार घडला आहे. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून महेश डामसे या तरुणाने एका विद्यार्थिनीवर कोयत्याने भीषण हल्ला केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी जुन्नरमधील एका वसतिगृहात राहून शिक्षण घेत होती. बुधवारी सकाळी ती महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली असता, सरकारी रुग्णालयाच्या पाठीमागे आरोपी महेशने तिला गाठले. लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरून त्याने तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर कोयत्याने सपासप वार केले.
 या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपी महेश घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध सुरू केला असता, आज सकाळी एका टेकडीवर त्याची दुचाकी आढळून आली. परिसराची पाहणी केली असता, एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत महेशचा मृतदेह पोलिसांना सापडला. प्राथमिक तपासानुसार त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे निवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जुन्नर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Tags
To Top