Khandala News l शिरवळ येथे १४ मार्चला ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ :नागरिकांच्या प्रलंबित कामांना मिळणार वेग

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरवळ : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या गतीमान प्रशासन उपक्रमांतर्गत महसूल विभागाशी संबंधित नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी शिरवळ (ता. खंडाळा) येथे शनिवार, दि. १४ मार्च रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.
 सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत केदारेश्वर मंदिराशेजारील दिवंगत तुकाराम कबुले सभागृहात हे शिबिर पार पडणार असल्याची माहिती वाई प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे व खंडाळा तहसीलदार सुहास थोरात यांनी दिली.
या अभियानाअंतर्गत प्रलंबित फेरफार, सातबारा उताऱ्यातील दुरुस्ती, जात व रहिवासी प्रमाणपत्र, घरपट्टे वाटप आदी विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. खंडाळा मंडळातील सर्व गावांतील खातेदारांना ७/१२ मधील दुरुस्तीकरिता विहित नमुन्यात अर्ज करता येणार असून, मयत खातेदारांच्या वारसांना वारस नोंदणीसाठी अर्ज सादर करता येणार आहे. तसेच ‘एकूण शेरा’ कमी करून फेरफारमधील वारसांची नावे ७/१२ मध्ये दाखल करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलिअर प्रमाणपत्र यांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच अकृषिक तरतुदींविषयी मार्गदर्शन, सामाजिक अर्थसाहाय्य योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अ‍ॅग्रीस्टॅक व पीएम किसान योजनेअंतर्गत शिल्लक खातेदारांची नोंदणीही करण्यात येणार आहे.
पुरवठा विभागाकडून दुबार रेशन कार्ड देणे, नाव कमी-जास्त करणे यासारखी कामेही या शिबिरात केली जाणार आहेत. खंडाळा मंडळातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नायब तहसीलदार हेमंत कामत, शिरवळ मंडल अधिकारी एम. आर. डोईफोडे तसेच मंडलातील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी केले आहे.
To Top