सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील श्री शहाजी विद्यालयातील अनुराग संतोष जुन्नरकर या विद्यार्थ्याची “ साकोरा हायस्कूल प्रोग्राम ऑफ जपान अँड इंडिया ” अंतर्गत महाराष्ट्रातील निवडक चार बालवैज्ञानिकांमध्ये निवड झाली आहे. यात सुप्याच्या अनुराग ची निवड झाल्याने शाळा व परिसरासाठी अभिमानाची बाब असुन परिसरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
अनुरागने “Portable Urine Kit in Buses for Male Passengers” ( बसमध्ये पुरुष प्रवाशांसाठी पोर्टेबल युरिन किट ) हा अभिनव प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पाद्वारे लांब पल्ल्याच्या बस प्रवासात प्रवाशांना भेडसावणारी लघवीची समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्यामुळे प्रवास अधिक सुखकर होऊ शकतो. या उपयुक्त आणि समाजाभिमुख संकल्पनेमुळे त्याची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली होती.
त्यानंतर नागपूर येथील महाराष्ट्र राज्य विज्ञान परिषद यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या इन्स्पायर अवॉर्ड उपक्रमांतर्गत त्याची कामगिरी विशेष ठरली. पुढे या प्रकल्पाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. त्यामुळे जुलै महिन्यात टोकियो (जपान) येथे होणाऱ्या दहा दिवसांच्या शैक्षणिक सहलीसाठी विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने अनुराग याची निवड करण्यात आली आहे. अनुरागचे मागिल वर्षी दहावी पर्यंतचे शिक्षण सुपे विद्यालयात झाले. त्यानंतर आकरावीचे शिक्षण बारामती येथील अकॅडमीमध्ये सुरु आहे.
या यशासाठी विद्यालयातील विज्ञान अध्यापक एस. बी. जगताप व एस. व्ही. चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेतील सर्व विज्ञान शिक्षक, ज्येष्ठ शिक्षक आर. बी. बनसोडे व झगडे तसेच बारामती तालुका विज्ञान अध्यापक संघ व पुणे जिल्हा विज्ञान संघ यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.
तर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम,उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, उपसचिव एल. एम. पवार, परीक्षा विभाग प्रमुख किरण देशपांडे व आजीव सदस्य आर. बी. खैरे आदींनी विद्यार्थ्याचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. येथील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. ए. लोणकर, उपमुख्याध्यापक डी. बी. यादव, पर्यवेक्षक एस. करे तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे सहकार्य लाभले. सुपे ग्रामस्थांनीही या यशाबद्दल विद्यार्थ्याचे व शिक्षकांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. .
