सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथे बुधवारी ( दि. १८ ) सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतात असलेल्या गव्हू, कांदा आणि गोट कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बाबुर्डीत दुपारी साडेपाचच्या दरम्यान आकाशात ढग जमा होवुन वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस झाला. हा पाऊस सुमारे पंधरा ते वीस मिनिट मुसळधार पडत होता. यावेळी घराच्या अंगणात गारांचा खच साचला होता. तर या पावसाने काही वेळातच सर्वत्र पाणीपाणी केले होते. त्यामुळे या परिसरात काढणीला आलेला गव्हू, काढलेला कांदा तसेच गोट कांद्याचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
सुप्यात मात्र दुपार नंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. संध्याकाळी सहाच्या दरम्यान विजांचा कडकडाट आणि ढगाचा गडगडाट सुरु होता. मात्र पावसाने सुपेकरांना हुलकावणी दिली. आज सकाळ पासुन वातावरणात उकाडा जाणवत होता. मात्र दुपारी झालेल्या पावसाळी वातावारणामुळे हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे काही अंशी उष्णता कमी होण्यास मदत झाली.
