Pune News l चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या; पोलिसांनी पतीला ठोकल्या बेड्या

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे : प्रतिनिधी 
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची बेदम मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवार, २४ मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर भागात घडली.
सारिका शुभम घोडके (वय २३) असे मृत महिलेचे नाव असून, याप्रकरणी पती शुभम श्रीकांत घोडके (वय २९) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम हा अंबिकानगर परिसरात पानटपरी चालवतो, तर त्याची पत्नी सारिका एका ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. शुभम हा गेल्या काही काळापासून सारिकाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात शुभमने सारिकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिच्यावर चाकूने सपासप वार केले. तसेच कठीण वस्तूने प्रहार केल्यामुळे सारिका गंभीर जखमी झाली.

 रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सारिकाला शेजाऱ्यांनी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखमा गंभीर असल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. कठीण वस्तूच्या प्रहारामुळे अंतर्गत इजा झाल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

घटनेनंतर आरोपी शुभम घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र, बिबवेवाडी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून त्याला अटक केली आहे. याप्रकरणी सारिकाची आई गेणीबाई रुपसिंग चव्हाण (वय ५०) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.
Tags
To Top