सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
आळंदी : प्रतिनिधी
ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन या सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षकांचे चौथे राज्यव्यापी अधिवेशन आळंदी येथे उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनास 32 जिल्ह्यांमधून जवळपास 600 लेखापरीक्षक उपस्थित होते. यावेळी सहकार खात्याचे अप्पर निबंधक श्री तुषार काकडे, सहनिबंधक श्री रावसाहेब जंगले, शासनाचे निवृत्त अप्पर सचिव श्री एस बी पाटील, सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री श्री विवेक जुगादे,आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कु-हाडे ,हभप डॉ. नारायणमहाराज जाधव राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, आय एस एस सी चे सेक्रेटरी अनिल करंजकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी लेखापरीक्षक व पतसंस्था यांनी एक विचाराने सहकारी चळवळीसाठी काम करूया असे आवाहन केले. सहकार भारतीचे विवेक जुगादे यांनी लेखापरीक्षकांनी संघटित होऊन आपल्या न्याय मागण्यासाठी लढा द्यावा व संघटनेच्या सभासद संख्येत जास्तीत जास्त वाढ करून आपली एकीची ताकद शासनास दाखवून द्यावी असे विचार मांडले. लेखापरीक्षकांच्या कोणत्याही अडचणीसाठी सहकार भारती नेहमीच मदत करेल असे त्यांनी सांगितले.
सहकार खात्यातील विविध अधिकाऱ्यांनीही लेखापरीक्षकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. अनिल कारंजकर यांनी लेखापरीक्षण व ए आय याविषयी मार्गदर्शन केल या दोन दिवसीय अधिवेशनामध्ये सर्व लेखापरीक्षकांसाठी खुले चर्चासत्र ठेवण्यात आले. लेखापरीक्षकांच्या अडचणी, सूचना यावर सर्वांनी एकत्रितपणे मंथन केले. पुढील कालावधीमध्ये सहकार खात्याला निवेदने देऊन कामे होत नसतील तर कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचेही ठरविण्यात आले.
यावेळी लेखापरीक्षणाचे उत्कृष्ट काम करणाऱ्या लेखापरीक्षकांचाही सन्मान करण्यात आला. जिल्हा वाईज लेखा परीक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्यामध्ये प्रथम पुरस्कार जळगाव येथील प्रकाश चौधरी यांनी पटकावला. याचबरोबर सहकार गौरव हा मानाचा पुरस्कार संभाजीनगर येथील संजय वाणी यांना प्रदान करण्यात आला. सहकार सेवा पुरस्कार रत्नागिरी येथील लक्ष्मण ठाकूर यांना देण्यात आला. तसेच विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लेखा परीक्षकांमधून सौ वैजयंता कुलकर्णी यांना अथलेटिक्स साठी तर रूपाली पाटील यांना कवयित्री म्हणून पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमास वरील पाहुण्यांना व्यतिरिक्त शांतीलाल सिंघवी, सुहास पटवर्धन, ऑडीटर्स कौन्सिलचे अध्यक्ष रामदास शिर्के, उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख, सचिव उमेश देवकर, सहसचिव दत्तात्रय पवार, खजिनदार संदीप नगरकर, विश्वस्त व सहसंयोजक बाळासाहेब वाघ, विश्वस्त श्रीकांत चौगुले, संजय घोलप, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त श्रीकांत चौगुले यांनी केले तर आभार प्रदर्शन नियोजन समिती अध्यक्षा राधा तुंगे यांनी केले..
