Pune ZP News l पुणे जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष; १५ इच्छुकांची 'देवगिरी'वर फिल्डिंग!

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे : प्रतिनिधी 
पुणे जिल्हा परिषदेच्या राजकारणात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चार विषय समित्यांच्या सभापती निवडीचा कार्यक्रम येत्या गुरुवारी (दि. २) पार पडणार असून, या निवडीत कुणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण या चार विषय समित्यांच्या सभापतींसाठी ही निवडणूक होत आहे. हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध झाल्याच्या पार्श्वभूमीवर, या विषय समित्यांच्या निवडीही बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. विषय समित्यांच्या निवडीचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ इच्छुक सदस्यांनी मुंबईतील 'देवगिरी' या निवासस्थानी भेटीगाठींचे सत्र सुरू केले आहे. जिल्ह्यातील अडीच लोकसभा मतदारसंघ आणि १० विधानसभा मतदारसंघांचे राजकीय तसेच जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवूनच ही पदे दिली जाणार आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद बारामतीला, तर उपाध्यक्षपद शिरूर लोकसभेला (आंबेगाव तालुका) मिळाले आहे. त्यामुळे आता उर्वरित चार सभापती पदांसाठी मावळ, मुळशी, जुन्नर, खेड, हवेली आणि शिरूर या तालुक्यांचे पारडे जड मानले जात आहे.

 शिरूर लोकसभा मतदारसंघाला एकूण दोन पदे मिळणार आहेत. उपाध्यक्षपद आधीच आंबेगावला गेल्याने आता केवळ एक सभापतीपद शिल्लक आहे. या एका पदासाठी शिरूर, हवेली, खेड आणि जुन्नर या चार तालुक्यांमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे वार्षिक नियोजन साधारण साडेचारशे कोटींचे असून, जिल्हा विकास आराखडा (DPDC) मिळून सुमारे ८५० कोटींच्या भरभक्कम निधीचे नियोजन या पदांच्या माध्यमातून होते. त्यामुळेच इच्छुकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

सध्या सभापती पदासाठी शांताराम इंगवले, करण खलाटे, विष्णू हिंगे, विक्रम खुटवड, जितेंद्र बडेकर, मोनिका हरगुडे, प्राजक्ता दुर्गाडे आणि छाया तांबे यांची नावे चर्चेच्या अग्रस्थानी आहेत. आता सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार कुणाच्या गळ्यात सभापतीपदाची माळ टाकतात, हे गुरुवारी स्पष्ट होईल.
Tags
To Top