Satara News l साताऱ्यात माणुसकीला काळिमा: जिल्हा रुग्णालयाकडून मृतदेहांची अदलाबदल; दोन कर्मचारी निलंबित

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी 
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि कर्मचाऱ्यांचा कमालीचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंगळवारी सकाळी दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी तातडीने पावले उचलत दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
सोनगीरवाडी (ता. वाई) येथील आनंद ओव्हाळ (२६) आणि आरळे (ता. सातारा) येथील सुरेश मस्कु खोमणे (५१) या दोघांचाही सोमवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
 मंगळवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, ओव्हाळ यांच्या नातेवाईकांना खोमणे यांचा, तर खोमणे यांच्या नातेवाईकांना ओव्हाळ यांचा मृतदेह देण्यात आला. सोनगीरवाडी येथे आनंद ओव्हाळ यांच्या अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाली होती. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारापूर्वी त्यांच्या आजीने नातवाचा चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. चेहरा उघडल्यानंतर तो आनंदचा मृतदेह नसल्याचे समोर आले आणि एकच खळबळ उडाली. तत्काळ रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, प्रशासनाने आपली चूक मान्य करत मृतदेह पुन्हा साताऱ्याला आणण्यास सांगितले. दुसरीकडे, आरळे येथे खोमणे यांच्या अंत्यसंस्कारासाठी चिता पेटवण्यात आली होती. रुग्णालय प्रशासनाचा फोन आल्यानंतर पेटलेली चिता विझवून मृतदेह पुन्हा रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकारामुळे दोन्ही कुटुंबांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत धरणे आंदोलन केले. "मृतदेह ताब्यात देताना चेहरा का दाखवण्यात आला नाही?" असा संतप्त सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत शंकर शिंदे आणि विशाल रावखंडे या दोन कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या महिन्यातील मृतदेह अदलाबदलीची ही दुसरी घटना असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल.
— डॉ. युवराज करपे, जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा.
To Top