सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
अथक परिश्रम, कमालीची चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर राख (ता. पुरंदर) येथील अमर विजय ढमढेरे याने चार्टर्ड अकाउंटंट (CA) या अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत सुयश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील एका तरुणाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण पुरंदर तालुक्यातून त्याचे कौतुक होत आहे.
सीए ही परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. मात्र, कोणत्याही संकटावर मात करण्याची जिद्द आणि अभ्यासातील सातत्य असेल तर यश नक्की मिळते, हे अमरने दाखवून दिले आहे. त्याने मिळवलेल्या या यशामुळे ढमढेरे कुटुंबासह मित्रपरिवार आणि राख गावाचे नाव जिल्ह्याच्या पातळीवर उंचावले आहे. अमरच्या या यशाची बातमी समजताच राख गावासह परिसरात आनंदाची लाट पसरली आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता असते, फक्त त्याला योग्य दिशा आणि मेहनतीची जोड मिळाली की आभाळ ठेंगणे होते,
अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. त्याच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
