सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तत्काळ व प्रभावी वापरामुळे कापूरहोळ येथील उद्योजकाच्या १८ वर्षीय मुलाचे झालेले अपहरण अवघ्या काही तासात शोधण्यात पुणे– सातारा पोलिसांना यश आले.या घटनेमुळे ग्राम सुरक्षा यंत्रणेची परिणामकारकता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार मंगळवार दि. ३ दुपारच्यावेळी कापूरव्होळ ता. भोर येथील उद्योजक लखन दळवी यांचा मुलगा पृथ्वीराज दळवी (वय १८) हा कापूरव्होळ येथील पुलाजवळून घरी जेवण्यासाठी जात असताना ३ ते ४ अज्ञात व्यक्तींनी काळ्या रंगाच्या एक्सयूवी ७०० कारमधून (एम.एच. १२ एक्स.इ ५३५३) त्याचे अपहरण केले.अपहरणकर्ते कापूरव्होळ– सारोळा– वीर– मांडकी मार्गे पळून गेले. त्यानंतर लखन दळवी यांनी तात्काळ पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.मात्र अपहरणकर्ते पसार झाले. घाबरलेल्या अवस्थेत ते शिरवळ पोलीस ठाण्यात पोहोचले.दरम्यान लखन दळवी यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांक 18002703600 वर कॉल करून माहिती दिल्यानंतर पुणे व सातारा जिल्ह्यातील अनेक गावे आणि पोलीस ठाण्यांना तात्काळ संदेश पोहोचला.त्यानंतर राजगड, खंडाळा, जेजुरी, सासवड, शिरवळ, लोणंद, भुईंज, फलटण ग्रामीण तसेच महामार्ग पोलीस व ग्रामस्थांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. गावोगावी नाकाबंदी करण्यात आली.
सुमारे एका तासाच्या शोधमोहीमनंतर मांडकी ता. पुरंदर गावाजवळ अपहरणकर्त्यांनी गाडी व पृथ्वीराज दळवी याला सोडून पलायन केले. युवक सुखरूप सापडल्याने पोलीस, कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. कापूरव्होळ ग्रामपंचायत, सरपंच, सदस्य, अधिकारी आणि पोलीस पाटील यांच्या प्रयत्नातून गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे राबविली जात असून आतापर्यंत विविध सूचनांसाठी या यंत्रणेचा १२ वेळा वापर करण्यात आला आहे.
