सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 अंतर्गत एक दिवसीय स्काऊट-गाईड शिबिर उत्साहात पार पडले. शनिवार, दि. 4 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराची सुरुवात लॉर्ड बेडन पॉवेल व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
शिबिरात फ्लॅग होस्टिंग, झेंडा गीत, प्रार्थना, परेड, नियमांचे वाचन, तंबू निरीक्षण, गॅझेट तयार करणे, विविध गाठी व बंधनांचे प्रकार, प्रथमोपचार, स्ट्रेचरचे प्रकार, बिनभांड्याचा स्वयंपाक, शेकोटी आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दैनंदिन जीवनात प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याचे बळ देणारी चळवळ म्हणजे स्काऊट-गाईड असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य मानसिंग जाधव व पर्यवेक्षक हनुमंत खरात यांनी शिबिरातील उपक्रमांची पाहणी केली. प्राचार्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी स्काऊट-गाईडमध्ये सहभागी व्हावे, यामुळे नैराश्य दूर राहते आणि कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता जगण्याचे बळ मिळते, असे मार्गदर्शन केले.
शिबिरासाठी स्काऊट मास्टर अशोक भोसले, युवराज वणवे तसेच गाईड कॅप्टन प्राजक्ता यादव व सविता कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
